१७ जुलै १९७५
इनामदार आणि सहकाऱ्यांची कार्यचक्रे जोरात सुरु झाली. मिळालेले पुरावे कोणत्या दिशेला अंगुलीनिर्देश करीत आहेत आणि आपली दिशा बरोबर आहे का यावर खल चालू होता.
"साहेब", - हवालदार, "आत येऊ का ?"
इनामदारांनी खुणेनेच आत बोलावले, हवालदार एक पाकीट देऊन गेला, पाकीट पाहून इनामदारांचे डोळे चमकले, हॉस्पिटल मधून आलेला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट होता, इनामदारांनी तातडीने टीम ची महत्वाची बैठक बोलावली.
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट नुसार रावसाहेबांना झोपेच्या गोळ्या देऊन मग त्यांचा गळा घोटण्यात आला होता त्यांच्या रक्तामध्ये काही अंशापर्यंत अल्कोहोलचे प्रमाणहि सापडले होते.
आत्ता, काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागला होता, एक म्हणजे अल्कोहोल, रावसाहेबांचा दिवसाचा फक्त एका पेगचाच कोटा होता हे सर्वांना ठाऊक होते, म्हणजेच घटनास्थळी भरलेला ग्लास हि खुन्याची दिशाभूल करण्यासाठीची एक चूक होती. खून झाला ती जागा म्हणजे रावसाहेबांची स्टडीरूम व्यवस्थित टापटीप होती, काहीच विस्कटले नव्हते म्हणजेच खून स्टडीरूम मध्ये झालाच नव्हता, कुठे तरी दुसऱ्याच ठिकाणी खून करून त्यांना स्टडीरूम मध्ये आणले होते. ज्याने कोणी खून केला तो कोणी सराईत गुन्हेगार नव्हताच कारण इतक्या चुका त्याने केल्या होत्या, पण एक हुशारी मात्र खुन्याने दाखवली होती ती म्हणजे कुठेही हाताच्या ठश्यांचे निशाण नव्हते.
"सर, जरी हे खरे असले तरी एक खुनी कोण हे कसे समजणार ?" - पो. नि. शिंदे
"हम्म... शिंदे या पोस्टमॉर्टेम मध्ये आणखी काही अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खुन्याच्या आणखी जवळ घेऊन जातात ." - इनामदार
"कोणत्या सर ?"
"गळ्यावर असणारे निशाण हे एकाच जागी स्थिर नाहीय, म्हणजे गळा आवळण्याचा प्रयत्न दोनतीन वेळा केला गेलाय, म्हणजे ट्राय, कन्फर्म, फेल, ट्राय बेसिस वर "
"म्हणजे ?"
इनामदार "गळा घोटून बघितल्यावर पाहिले, श्वास चालू आहे, मग पुन्हा घोटला, कन्फर्म होई पर्यंत प्रयत्न केले गेले, दुसरी गोष्ट गळा घोटण्यासाठी रस्सी किंवा बेल्टचा वापर केला गेला नाही, कारण असे कोणतेच निशाण नाहीत, आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट"
"कोणती सर?"
"खुन्याने ज्या पद्धतीने गळा घोटला त्यावरून खुनी हा डावखुरा आहे " - इनामदार
इनामदार जसे बोलले तसे लगेच इं. पाटीलचे डोळे चमकले, "सर, खुनी सापडलाय !!!"
"कोण?" पो. नि शिंदे
"राजवर्धन रावसाहेब देशमुख " - इं. पाटील, "राजवर्धन हा डावखुरा आहे सर"
"तुम्हाला कसे माहित?" इनामदार
"सर, राजवर्धनला ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या केस मध्ये अरेस्ट झाली होती, मीच अटक केली होती त्याला, पण रावसाहेबांनी केस दाबून टाकली होती".
केस सुटली होती!!! खुनी कोण हे कळले होते, इनामदारांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या रेषा उमटल्या होत्या, आत्ता फक्त मिळालेल्या पुराव्यानुसार राजवर्धनाला अटक करून त्याला बोलते करायचे होते
"गुड जॉब पाटील !! " - इनामदार
" शिंदे, वॉरंट काढून घ्या लवकर, आणि राजवर्धन आत्ता जिथे असेल त्याला अटक करा !!"
"साहेब, आत येऊ का?" - हवालदार कदमने दरवाजा ठोठावला
"काय झाले?" इनामदार
"साहेब, रावसाहेबांच्या वाड्यावरून फोन आला होता आत्ताच " कदम
"कोणाचा ?"
"रावसाहेबांचा नोकर किसन, त्यांच्या माळ्याला, रामसेवकला, आज सकाळी बागेत खोदकाम करताना जमिनीत पुरलेली बॉडी सापडली"
"कोणाची बॉडी काही समजले का ?"
"राजवर्धन देशमुख ची !!!"
"काय !!"
क्रमशः
No comments:
Post a Comment