Sunday, May 3, 2020

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत सांगितलेलं काळात नाय काय? इंग्लिशमध्ये सांगू?". सैराटचे संगीतही इतके भन्नाट होते कि, प्रत्येक समारंभात त्यातल्या गाण्यांशिवाय समारंभ पूर्ण होत नसे. पण चित्रपटाचा शेवट काळजाचं पाणी करून गेला, प्रेक्षकांबरोबर आत्ता नागराज मंजुळेंना सुद्धा असे वाटू लागले होते कि याचा दुसरा पार्ट आलाच पाहिजे , तसापण सिक्वेल चा जमाना आहे, सगळॆचजण आपआपल्या चित्रपटांचे पुढचे भाग काढत आहेत तर आपण का नाही?

नागराजने खूप डोके चालवले पण त्यांना  काही जमेना शेवटी त्याने डिक्लेर केले कि मी सैराट - २ काढत आहे, जो कोणी जबरदस्त स्टोरी पाठवेल त्याला चित्रपटाचा प्रॉफिट शेअर दिला जाईल. काही दिवसांनी भारतभरहून अनेक नामांकित दिग्दर्शकांनी आपाल्या पटकथा थोडक्यात पाठवून दिल्या, नागराज मंजुळेंनी त्या पटकथा वाचायला घेतल्या आहेत. 

रवी जाधव :
परश्या-आर्ची च्या मुलाला त्यांच्या शेजाऱ्यांनी आपल्या घरी ठेऊन घेतले, परश्या आर्चीची ची आठवण म्हणून  त्यांनी या मुलाचे नाव ठेवले 'पार्शी'. पार्शी  आत्ता १० वर्षांचा झालाय, आणि त्याला त्याच्या शाळेचा एक मित्र बीपी ची सीडी आणून देतो, पार्शीला सीडी आणून देणारा मित्र हा प्रिंसमामाचा मुलगा असतो, घरच्यांना हे कळल्यावर ते पार्शीला घेऊन मुंबईत पळून येतात. पारशीचं शिक्षणात लक्ष लागत नाही तो पेपर टाकायला सुरवात करतो, त्याची भेट प्राजुशी होते, प्राजुशी आणि त्याच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागताच प्राजूचे वडील तिला घेऊन साताऱ्याला येतात. १२ वर्षांनी आपला पार्शी मोठा बॉडी बिल्डर झालेला असतो. तो प्राजूला भेटायला साताऱ्याला जातो, तेथे गेल्यावर त्याला कळते कि प्राजु आत्ता  तमाशात काम करते आहे, पार्शी तमाशाच्या फडावर जातो, प्राजुला भेटतो आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवतो, पण प्राजुला आत्ता तीच करिअर बनवायचं असतं, ती उलट पर्शीला तमाशात काम करण्याची ऑफर देते, पण मग कुठला रोल? तर नाच्या चा. प्राजूसाठी पार्शी तेही करतो, शेवटी पन्नास वर्षांनी त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळतो... 

महेश मांजरेकर : 
एका मध्यमवर्गीय कुटुंबाने या मुलाचा सांभाळ केलाय त्याच आत्ता नाव आहे सिद्धार्थ मकरंद खेडेकर (मांजरेकरांनी घाईत त्यांच्या तीन फेव्हरेट नटांची नावे एकत्र केली), सिद्धूला मुंबईत राहून मराठी बोलता न येणाऱ्यांचा प्रचंड राग आहे, वेळोवेळी खुद्द शिवाजी महाराज येऊन त्याला उपदेशाचे बोल सुनावतात आणि योग्य मार्ग दाखवतात. सिद्धू स्वतः शाळा शिकत नाही पण शिक्षण व्यवस्थेविरुद्ध उठून उभा राहतो, त्याच्या जीवनाचं एकच ध्येय होतं घरात पन्नास तोळ्यांचे दागिने असले पाहिजेत आणि अंगणात एक 'घोडा'. सिद्धूच्या बहिणीने नाचाच्या स्पर्धेत भाग घेतला असतो त्यात ती हरते म्हणून सिद्धू महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेत भाग घेतो, त्यात तो जिंकतो, आणि त्याच ऑटिंगचं करिअर सुरु होतं, सगळे जण सिदधूला नटसम्राट म्हणून ओळखू लागतात, त्याच्या " स्कॉचं स्पर्श " या सिनेमाचे त्याला ऑस्कर मिळते...... 

मृणाल कुलकर्णी :
एका पुणेरी ..... ब्राम्हण कुटुंबीयांनी या मुलाचा सांभाळ केलाय, आत्ता त्याचं नाव आहे प्रद्युमनं द्रुष्टद्युमनं यज्ञोपवीत. त्याला स्वतःला हे नाव उच्चरत येत नाही आणि हीच या कुटुंबाची खूप मोठी डोकेदुखी आहे. खरेतर आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार. प्रद्युम्नाच्या मित्रांची नावे हि हृदयवदन, चतुर्मुख, श्रीलेश, स्वयंभू अशी होती. घरच्या आमटी भाताऐवजी त्याला मांसाहारी जेवणाची चटक  लागली  होती. प्रद्युमनं ला या संकटातून काढायचे कसे हा या कुटुंबियांमधला मोठा प्रश्न होता. शेवटी काही करून नातेसंबंध जपायचे होते. 

रोहित शेट्टी :
बाजीराव सिंघम या मुलाला दत्तक घेतो आणि त्याच नाव ठेवतो सूर्या, सूर्याला खूप मोठा माणूस व्हायचं असतं, त्याला गुंडांशी लढणाऱ्या लोकांना मदत करायची असते म्हणून तो गॅरेज खोलतो, त्यात तो तुटलेल्या, मोडलेल्या, आदळलेल्या, आपटलेल्या गाड्यांचे डेन्टीन्ग पेंटिंग करत असे. बाजीराव आणि सिम्बा काकांमुळे त्याला खूप काम मिळाले होते.  एकदा असाच फिरत फिरत सूर्या आपल्या मित्रांना म्हणजेच गोपाल, माधव, लक्ष्मण यांना घेऊन चेन्नईला पोहोचतो. तिथे त्याची भेट मिनाम्मा बरोबर होते. त्याला  मिनाम्मा बरोबर लग्न करायचे होते, तिचे वडीलही राजी होतात, पण गोपाल, माधव, लक्ष्मण यांनाही तिच्याशी लग्न करायचे असते म्हणून ते या लग्नात खोडा घालायला सुरवात करतात, शेवटी सूर्या थंगबली ची मदत घेतो आणि त्यांचा काटा काढतो  

कारण जोहर :
पंजाबी कुटुंबीयांनी या मुलाला दत्तक घेतले होते. आत्त्ता त्याचे नाव होते राज मल्होत्रा,  वीस वर्षांनी अमेरिकेहून शिकून येतो भारतात त्याची भेट रिया शी होते. रिया राजवर प्रेम करू लागते,  रिया वर राज चा  लहानपाणीचा जिवलग मित्र राहुल प्रेम करतोय. पण राजचे  अमेरिकेतला मित्र केविन वर प्रेम असते. केविन तसा  नसतो, केवीनचे रिहाना  वर प्रेम असते. राजचे रियाशी लग्न ठरते, त्याच्या लग्नासाठी केविन आणि रिहाना भारतात येतात. राजचे संगीत चालू असते आणि रिहाना राजच्या वडिलांना बघते तिचे त्यांच्यावर प्रेम जडते, शेवटी राजचे लग्न तुटते, त्या हॉल मध्ये राजचे वडील आणि रिहाना लग्न करतात.... राज राहुलला प्रपोज करतो, राहुल विष खातो. 

   
नागराज मंजुळे यांनी सैराट - २ ची कल्पना सध्यातरी बासनात गुंडाळून ठेवलीय . 

समाप्त 

आपला अभि,

2 comments:

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...