Sunday, May 3, 2020

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत सांगितलेलं काळात नाय काय? इंग्लिशमध्ये सांगू?". सैराटचे संगीतही इतके भन्नाट होते कि, प्रत्येक समारंभात त्यातल्या गाण्यांशिवाय समारंभ पूर्ण होत नसे. पण चित्रपटाचा शेवट काळजाचं पाणी करून गेला, प्रेक्षकांबरोबर आत्ता नागराज मंजुळेंना सुद्धा असे वाटू लागले होते कि याचा दुसरा पार्ट आलाच पाहिजे , तसापण सिक्वेल चा जमाना आहे, सगळॆचजण आपआपल्या चित्रपटांचे पुढचे भाग काढत आहेत तर आपण का नाही?

नागराजने खूप डोके चालवले पण त्यांना  काही जमेना शेवटी त्याने डिक्लेर केले कि मी सैराट - २ काढत आहे, जो कोणी जबरदस्त स्टोरी पाठवेल त्याला चित्रपटाचा प्रॉफिट शेअर दिला जाईल. काही दिवसांनी भारतभरहून अनेक नामांकित दिग्दर्शकांनी आपाल्या पटकथा थोडक्यात पाठवून दिल्या, नागराज मंजुळेंनी त्या पटकथा वाचायला घेतल्या आहेत. 

रवी जाधव :
परश्या-आर्ची च्या मुलाला त्यांच्या शेजाऱ्यांनी आपल्या घरी ठेऊन घेतले, परश्या आर्चीची ची आठवण म्हणून  त्यांनी या मुलाचे नाव ठेवले 'पार्शी'. पार्शी  आत्ता १० वर्षांचा झालाय, आणि त्याला त्याच्या शाळेचा एक मित्र बीपी ची सीडी आणून देतो, पार्शीला सीडी आणून देणारा मित्र हा प्रिंसमामाचा मुलगा असतो, घरच्यांना हे कळल्यावर ते पार्शीला घेऊन मुंबईत पळून येतात. पारशीचं शिक्षणात लक्ष लागत नाही तो पेपर टाकायला सुरवात करतो, त्याची भेट प्राजुशी होते, प्राजुशी आणि त्याच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागताच प्राजूचे वडील तिला घेऊन साताऱ्याला येतात. १२ वर्षांनी आपला पार्शी मोठा बॉडी बिल्डर झालेला असतो. तो प्राजूला भेटायला साताऱ्याला जातो, तेथे गेल्यावर त्याला कळते कि प्राजु आत्ता  तमाशात काम करते आहे, पार्शी तमाशाच्या फडावर जातो, प्राजुला भेटतो आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवतो, पण प्राजुला आत्ता तीच करिअर बनवायचं असतं, ती उलट पर्शीला तमाशात काम करण्याची ऑफर देते, पण मग कुठला रोल? तर नाच्या चा. प्राजूसाठी पार्शी तेही करतो, शेवटी पन्नास वर्षांनी त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळतो... 

महेश मांजरेकर : 
एका मध्यमवर्गीय कुटुंबाने या मुलाचा सांभाळ केलाय त्याच आत्ता नाव आहे सिद्धार्थ मकरंद खेडेकर (मांजरेकरांनी घाईत त्यांच्या तीन फेव्हरेट नटांची नावे एकत्र केली), सिद्धूला मुंबईत राहून मराठी बोलता न येणाऱ्यांचा प्रचंड राग आहे, वेळोवेळी खुद्द शिवाजी महाराज येऊन त्याला उपदेशाचे बोल सुनावतात आणि योग्य मार्ग दाखवतात. सिद्धू स्वतः शाळा शिकत नाही पण शिक्षण व्यवस्थेविरुद्ध उठून उभा राहतो, त्याच्या जीवनाचं एकच ध्येय होतं घरात पन्नास तोळ्यांचे दागिने असले पाहिजेत आणि अंगणात एक 'घोडा'. सिद्धूच्या बहिणीने नाचाच्या स्पर्धेत भाग घेतला असतो त्यात ती हरते म्हणून सिद्धू महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेत भाग घेतो, त्यात तो जिंकतो, आणि त्याच ऑटिंगचं करिअर सुरु होतं, सगळे जण सिदधूला नटसम्राट म्हणून ओळखू लागतात, त्याच्या " स्कॉचं स्पर्श " या सिनेमाचे त्याला ऑस्कर मिळते...... 

मृणाल कुलकर्णी :
एका पुणेरी ..... ब्राम्हण कुटुंबीयांनी या मुलाचा सांभाळ केलाय, आत्ता त्याचं नाव आहे प्रद्युमनं द्रुष्टद्युमनं यज्ञोपवीत. त्याला स्वतःला हे नाव उच्चरत येत नाही आणि हीच या कुटुंबाची खूप मोठी डोकेदुखी आहे. खरेतर आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार. प्रद्युम्नाच्या मित्रांची नावे हि हृदयवदन, चतुर्मुख, श्रीलेश, स्वयंभू अशी होती. घरच्या आमटी भाताऐवजी त्याला मांसाहारी जेवणाची चटक  लागली  होती. प्रद्युमनं ला या संकटातून काढायचे कसे हा या कुटुंबियांमधला मोठा प्रश्न होता. शेवटी काही करून नातेसंबंध जपायचे होते. 

रोहित शेट्टी :
बाजीराव सिंघम या मुलाला दत्तक घेतो आणि त्याच नाव ठेवतो सूर्या, सूर्याला खूप मोठा माणूस व्हायचं असतं, त्याला गुंडांशी लढणाऱ्या लोकांना मदत करायची असते म्हणून तो गॅरेज खोलतो, त्यात तो तुटलेल्या, मोडलेल्या, आदळलेल्या, आपटलेल्या गाड्यांचे डेन्टीन्ग पेंटिंग करत असे. बाजीराव आणि सिम्बा काकांमुळे त्याला खूप काम मिळाले होते.  एकदा असाच फिरत फिरत सूर्या आपल्या मित्रांना म्हणजेच गोपाल, माधव, लक्ष्मण यांना घेऊन चेन्नईला पोहोचतो. तिथे त्याची भेट मिनाम्मा बरोबर होते. त्याला  मिनाम्मा बरोबर लग्न करायचे होते, तिचे वडीलही राजी होतात, पण गोपाल, माधव, लक्ष्मण यांनाही तिच्याशी लग्न करायचे असते म्हणून ते या लग्नात खोडा घालायला सुरवात करतात, शेवटी सूर्या थंगबली ची मदत घेतो आणि त्यांचा काटा काढतो  

कारण जोहर :
पंजाबी कुटुंबीयांनी या मुलाला दत्तक घेतले होते. आत्त्ता त्याचे नाव होते राज मल्होत्रा,  वीस वर्षांनी अमेरिकेहून शिकून येतो भारतात त्याची भेट रिया शी होते. रिया राजवर प्रेम करू लागते,  रिया वर राज चा  लहानपाणीचा जिवलग मित्र राहुल प्रेम करतोय. पण राजचे  अमेरिकेतला मित्र केविन वर प्रेम असते. केविन तसा  नसतो, केवीनचे रिहाना  वर प्रेम असते. राजचे रियाशी लग्न ठरते, त्याच्या लग्नासाठी केविन आणि रिहाना भारतात येतात. राजचे संगीत चालू असते आणि रिहाना राजच्या वडिलांना बघते तिचे त्यांच्यावर प्रेम जडते, शेवटी राजचे लग्न तुटते, त्या हॉल मध्ये राजचे वडील आणि रिहाना लग्न करतात.... राज राहुलला प्रपोज करतो, राहुल विष खातो. 

   
नागराज मंजुळे यांनी सैराट - २ ची कल्पना सध्यातरी बासनात गुंडाळून ठेवलीय . 

समाप्त 

आपला अभि,

Saturday, May 2, 2020

मोऱ्यागावचे जागृत मंदिर

गावात लगबग सुरु झाली होती,  मोठ मोठाले टेम्पो गावात आले होते. जत्रा तर नव्हती, जत्रेला अजून बराच अवकाश होता. आणि इतके पॉश टेम्पो आणि गाड्या म्हणजे काही तरी वेगळेच होते. कानावर पडल्याप्रमाणे गावात पिच्चरचं शूटिंग होणार होतं. कोणत्या पिच्चरचं ? हिरो ,हिरोईन कोण हे अजून तरी कळले नव्हते, पण पिच्चरचं शूटिंग म्हणून गावकऱ्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. काही शहरी, काही विदेशी पाहुणीमंडळी  गावामध्ये आली होती. 

कसले शूटिंग? कोण येणार वगैरे गोष्टी सरपंचांना नक्की ठाऊक असणार उगाचच का त्यांनी नुकताच वाड्यावर नवीन रंग काढून घेतला होता?  एसी बसवून घेतला होता. जे कोण हिरो हेरॉईन असणार त्यांना पाहुणचाराला घरी बोलावणार आणि शायनिंग मारून घेणार. पण कोण येणार वगैरे गोष्टी त्यांनी उघड केल्या नव्हत्या. 

मोऱ्या गावाला निसर्गाचा खूप मोठा आशीर्वाद लाभला होता. मोठं मोठाले डोंगर, हिरवाईची अपूर्वाई, नदी, धबधबा, उबदार वातावरण. गावकरीही निसर्गाचं ऋण जाणून होते, म्हणूनच त्यांची वर्तणूकही शिस्तबद्ध अशीच होती. सरकारच्या योजनांच्या कुबड्या गावाने कधीच धरल्या नव्हत्या. 'आपला विकास आपणच' हे गावचे धोरण होते, मग जर कुणाला अश्या निसर्गदत्त भागाची भुरळ न पडती तर नवलच, म्हणूनच एका चित्रपट निर्मिती करणाऱ्या मोठा संस्थेने आपल्या चित्रपटाचा काही भाग या गावात चित्रित करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे पूर्ण समूह या गावात आला होता.                

पारा पारावर गप्पांचा फड जमू लागला होता, नदीकाठी, विहिरीवर, गावच्या वाण्याच्या दुकानात सगळीकडे एकाच चर्चा, गावात पिच्चरचं  शूटिंग.

"अरे गण्या हिकडं ये " पारावरच्या एकानं लगबगीनं जाणाऱ्या गण्याला बोलावलं. गण्या सरपंचाच्या घरातला एक सांगकाम्या  नोकर होता.  "कुठं चालला रं "

"कामं हायेत, सरपंचांनी तालुक्याला जायला सांगितलंय सामान आणायला चाललो, पाव्हणं येणार हायेत"

"जाशील लेका, कोण पाव्हणं ते तर सांग, पिच्चरची हायती ना, खरं सांग गड्या, पिच्चरचे हिरो हिरोईन येणार ना ? "

"हिरो नाय, फक्त हिरवीन"  

"फक्त हिरोईन? कोण हाय रं हिरोईन? "

"ती रं , ती हाय ना लावनी लावनी का कोणी तरी"

"कोण?"

"आरं ती न्हाई का, तिचे ते वाले व्हिडीओ मोबाईल मध्ये बघितले व्हते, हा ती रं, बॉबी लावनी"

गण्या निघून गेला. पारावरचे  सारे खुश झाले होते, गावात चक्क बॉबी लिओनी येणार होती. दोन दिवसांनी शूटिंग सुरु झाली होती, काम धंधे सोडून सारे गावकरी शूटिंगच्या ठीकाणी जमत असत. शुटिंगचा शेवटचा दिवस होता  दुसऱ्या दिवशी बॉबी परत जाणार होती, म्हणून तिने सरपंचांना गाव दाखवण्याचा आग्रह केला. सरपंच गण्या बॉबी आणि बॉबीचे काही क्रूमेम्बर्स गावबघायला बाहेर पडले. बऱ्याच गोष्टी पाहून झाल्यावर बॉबीने सहजच विचारले ते तिथे काय आहे?

सरपंचांना आणि गाण्याला ज्याची भीती होती तेच झाले, बॉबीने टेकडीवरच्या मंदिराकडे बोट दाखवले. सरपंच आणि बॉबी टाळाटाळाच करत होते पण शेवटी बॉबी ने लाघवीपणे विचारले "सांगा ना ... " आणि सरपंच विरघळलेच. 

"ते गावंच जागृत देवस्थान आहे टोणग्यास्वामीचं मंदिर, त्या मंदिरात सहसा कोण जात नाही कारण तो देव जागृत आहे, आणि जर का त्या मंदिरात गेल्यावर मनात काही पाप आलं तर ती व्यक्ती जिच्या मनात पाप आलय त्या व्यक्तीवर देव को कोपतो आणि ती व्यक्ती लगेचच गायब होते. अश्यावेळी ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट होतो मंदिरातल्या घंटा जोरात वाजू लागतात. "

"असे कुठे होते का, काही पण नॉन्सेन्स " एक क्रूमेम्बर 

"खरं हाय सरपंचाचं, मंदिरात गेल्यावर मनात वाईट विचार आलं कि टोणग्यास्वामी लगेच त्या माणसाला गायब करतो, सरपंचांच्या वडलांना तसेच गायब केले जेव्हा ते पाटलीन बाईसोबत आत गेले, पाटलीन बाईंना बघितले आणि लगेच गायब " सरपंचांनी गाण्याकडे रागाने बघितले.  "अशी खूप जन गायब झालती."

" आय वॉन्ट टू  सी,  मला बघायचंय ". बॉबी लिओनीने हट्टच धरला,सरपंचांनी  क्रूमेम्बर्सनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना तिचा बॅकग्राउंड चांगलाच माहित होता, त्यात ती गाव बघायला तोकडे कपडे घालून आली होती, अर्धा गाव त्यांच्या मागेच होता, अशा परिस्थिती बॉबी आत जाणार म्हणजे नक्कीच गायब होणार, पण बॉबी काही ऐकेना, आणि तिच्यासोबत मंदिरात जायला कोणी धजावेना. शेवटी बॉबीने आत एकटीनेच जायचा निर्णय घेतला. 

सगळेजण बाहेर थांबले, बॉबीने मंदिराचा दरवाजा उघडला, आत शिरली, समोर असलेल्या टोणग्यास्वामीच्या मूर्तीला नमस्कार करायला वाकली, तोच विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, मंदिरातील घंट्यांचा घंटानाद,मंदिराभोवती काळे ढग जमा झाले, वातावरण बिघडू लागले. बाहेरची मंडळी काय समजायची ती समजली. थोड्यावेळाने सर्व शांत झाले, बाहेर जमलेले सगळे भयभीत होऊन परत जायला निघाले तोच  मागून आवाज आला . 

"हॅय  वेट फॉर मी " गावकऱ्यांनी चमकून मागे बघितली, बॉबी लिओनी होती, अगदी सहीसलामत. 

बॉबी जवळ आली सरपंचांनी विचारले, "अहो मॅडम तुम्ही  तर सहीसलामत आहात मग हा एवढा आवाज, देवाचा प्रकोप, काय झालं काय ???"

बॉबी लिओनी तिच्या मधाळ आवाजात उच्चारली "देव गायब झालाय !!!! "


समाप्त 

आपला अभि,                   
                       

सैराट - २

सैराट रिलिज झाला, आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर तुफान चालला, लहान  थोर सर्वांच्या तोंडी पिक्चर मधले डायलॉग्स, "मराठीत ...